रांजणगाव एमआयडीसीत दुर्दैवी अपघात; टेम्पो चालकाचा मृत्यू
रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूस पडदा बांधत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक कंपनीत माल भरून झाल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूस पडदा बांधत होता. यावेळी तो टेम्पो आणि लोडिंग रॅम्प यांच्या दरम्यान अडकून गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने शिरूर येथील माणिकचंद धारिवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.
औद्योगिक परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी कामगार व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेनिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

