शिरूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांची करडी नजर ; – पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल

शिरूर : सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर शहर व तालुक्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी शिरूर पोलीस ठाण्यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पत्रकार परिषदेत बोलताना गिल्ल म्हणाले की, शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार रोजगारासाठी येत आहेत. त्यांच्या वास्तव्यामुळे काही भागांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्याचे निदर्शनास येत असून, अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष उपाययोजना राबविणार आहे.
करडे औद्योगिक वसाहती परिसरात अलीकडील काळात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्रियपणे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या अमली पदार्थांच्या विळख्यात अनेक तरुण अडकत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांविरोधात विशेष कारवाई करून दोषींना कायद्याच्या चौकटीत आणले जाईल, असे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले.
शिरूर पोलीस स्टेशन लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील तसेच पोलिसांचे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, महिला सुरक्षेसाठी विविध उपक्रम आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कामाचेही पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.
नागरिकांनी आपल्या परिसरात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, गुन्हे किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करत गिल्ल म्हणाले की, “गुन्हेगारीविरोधातील लढा हा केवळ पोलिसांचा नसून समाजातील प्रत्येक घटकाचा आहे. नागरिक, पत्रकार, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यासच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल.”
पत्रकार परिषदेला पोलीस अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने जनसहभागावर भर देण्याचा स्पष्ट संदेश या संवादातून दिला.

संपादक : सुदर्शन दरेकर

