अखेर शिरूरकरांचे स्वप्न साकार होणार ; पुणे-शिरूर उन्नत महामार्गाचे भूमिपूजन, वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

शिरूर :सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
शिरूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून बहुचर्चित पुणे-शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाने पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेषतः पुणे-शिरूर उन्नत महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीत मोठी घट होणार असून शिरूर तालुक्यातील नागरिक, रांजणगाव एमआयडीसीतील हजारो कामगार, उद्योजक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची मागणी सातत्याने होत होती. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी विधानसभेत हा प्रश्न सातत्याने मांडला होता. तसेच माजी आमदार अशोक पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या भूमिपूजनामुळे शिरूरकरांच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून, पुणे-शिरूर उन्नत महामार्ग हा परिसराच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

