शिरूर नगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय! बी.जे. कॉर्नर–गोलेगाव रस्त्यास स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांचे नाव; हद्दवाढ प्रस्तावालाही एकमताने मंजूर!

शिरूर-सुदर्शन दरेकर
शिरूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरातील बी.जे. कॉर्नर ते गोलेगाव रस्ता यास स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच, बहुचर्चित शिरूर शहर हद्दवाढ प्रस्तावालाही सभेत मंजुरी मिळाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या कार्यकाळात झालेल्या या निर्णयामुळे स्व. बाबुराव पाचर्णे यांनी शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार म्हणून केलेल्या विकासकामांना नगरपालिकेने अभिवादन केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाचा विचार करून हा ठराव मंजूर करण्यात आला. हा निर्णय पाचर्णे कुटुंबीयांसाठी सन्मानाचा असून, तालुक्यातील त्यांच्या असंख्य समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शिरूर शहराच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हद्दवाढ प्रस्ताव देखील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार शिरूर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी आणि गोलेगाव या गावांचा शिरूर नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, या हद्दवाढीला संबंधित गावांतील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींचा कितपत पाठिंबा मिळतो, हे पुढील प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे. शिरूर शहरातील वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा तसेच शिरूर ग्रामीण परिसरातील वेगाने होत असलेले शहरीकरण लक्षात घेता हद्दवाढ आवश्यक असल्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी यापूर्वी विधानसभेतही स्पष्ट केले होते.
राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, या हद्दवाढ प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा आणि आवश्यक कार्यवाही अधिक वेगाने केली जाणार आहे. त्यामुळे शिरूरच्या विकासाच्या दृष्टीने नगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेतील निर्णयांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

