महिला-बालकल्याण विभागाच्या नावाखाली लाखोंची आर्थिक फसवणूक; शिरूर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांची पोलीस ठाण्यात तक्रार

शिरूर | प्रतिनिधी
महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT/NT) तसेच इतर सर्वसामान्य महिला व पुरुषांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार शिरूरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी वर्षा इमरान सौदागर शेख (उर्फ वर्षा शिंदे रासकर) यांनी त्यांच्या पतीसह तसेच शिरूर नगरपरिषदेच्या कर्मचारी सुप्रिया स्वप्नील गोसावी यांच्या समवेत अनेक महिला व पुरुषांना महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी, फाईल चार्ज, कागदपत्रांचा खर्च आणि इतर कारणे सांगून प्रत्येक अर्जदाराकडून २५ हजार रुपयांपासून ते २ लाख ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम रोख व ऑनलाइन पद्धतीने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या माध्यमातून जवळपास १०० महिला व पुरुषांची फसवणूक करून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील बहुतांश पीडित महिला व पुरुष हे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT/NT) या सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, संबंधितांकडून पैसे घेतल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही अर्जदाराला शासकीय कर्ज मंजूर झालेले नाही. उलट वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच मुख्य आरोपी सौ. वर्षा इमरान सौदागर शेख (उर्फ वर्षा शिंदे रासकर) या मागील दोन महिन्यांपासून फरार असून त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात तसेच लागू होणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सर्व पीडितांची लुबाडलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे शिरूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या तक्रारीची प्राथमिक पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

