आषाढी वारीसाठी राज्य सरकारची जय्यत तयारी; प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा, लाखो वारकऱ्यांना मिळणार तातडीची आरोग्यसेवा

पुणे : सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
“आषाढी एकादशीची वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा” अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध आषाढी वारीसाठी राज्य सरकारने यंदा अभूतपूर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यासाठी एअर ॲम्बुलन्स सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका, प्रशिक्षित आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेचा वापर करून लाखो वारकरी भाविकांना त्वरित उपचार सेवा देण्याचे सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी वारीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या व्यापक नियोजनाची माहिती सादर केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरोग्यदायी करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सज्ज झाला असून, लाखो वारकरी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

