अनुसूचित जाती आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची जोरदार मागणी; शिरूरमध्ये मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा

शिरूर, दि. ५ : सुदर्शन दरेकर
अनुसूचित जातीतील मातंग समाजाला न्याय्य आरक्षणाचा वाटा मिळावा तसेच अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ अंतर्गत उपवर्गीकरण लागू करून प्रत्येक घटकाला सामाजिक, शैक्षणिक व प्रतिनिधित्वाच्या आधारे न्याय्य वाटा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शिरूर शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मार्केट यार्ड) येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरूर तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयाच्या आवारात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोर्च्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर शिरूर तहसीलदारांना निवेदन देत राज्य शासनाकडे तातडीने सकारात्मक शिफारस करण्याची मागणी करण्यात आली.
विशाल (बंटी) जोगदंड म्हणाले :“मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून सामाजिक न्यायासाठी आहे. अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारला जाईल. एकजुटीच्या बळावर मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.”
निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातीतील मातंग समाज हा अनेक दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिला असून विद्यमान आरक्षण व्यवस्थेचा अपेक्षित लाभ समाजातील मोठ्या घटकापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे.
मोर्चेकऱ्यांनी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, मातंग समाजाला स्वतंत्र व न्याय्य आरक्षणाचा वाटा द्यावा, शैक्षणिक प्रवेश, सरकारी नोकऱ्या व विविध शासकीय योजनांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व मिळावे तसेच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विशेष योजना राबविण्यात याव्यात, अशा मागण्या केल्या.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यभैय्या चांदणे, आझाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे, आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक नगीना सोमनाथ कांबळे आणि युवा नेते अमोल शेरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मातंग समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अजिंक्यभैय्या चांदणे यांनी आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील विविध बाबी समाजासमोर मांडल्या. तसेच समाजातील महापुरुषांबाबत सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांचा निषेध व्यक्त केला. विष्णूभाऊ कसबे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २०२४ मधील निर्णयाचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाने तातडीने कायदा पारित करून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी केली.
या प्रसंगी नगरसेविका तथा सभापती स्वाती साठे, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे, आयोजक विनोद (पप्पू) साठे, विशाल (बंटी) जोगदंड, दादाभाऊ लोखंडे, चेतन साठे, रवींद्र खुडे, मोनिका जाधव, रियाज सय्यद, भाऊसाहेब जाधव, तुषार भवाळ, अविनाश साबळे, विश्वास पाटोळे, विनोद घाडगे, विजू (लाला) जगधने, नितीन काळे, सोनू काळोखे, प्रशांत साळवे यांच्यासह शिरूर, पुणे व नगर जिल्ह्यातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन साठे यांनी केले, तर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक : सुदर्शन दरेकर

