आईच्या संस्कारांचा प्रेरणादायी जागर; मातोश्री गंगूबाई घावटे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये भावपूर्ण कार्यक्रम; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचीही घोषणा
शिरूर : चावडीराज न्युज नेटवर्क

“प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई”… प्रत्येकाच्या आयुष्याला आकार देणारी, संकटात धैर्य देणारी आणि यशाचा मार्ग दाखवणारी शक्ती म्हणजे आई. अशाच मातृऋणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वर्गीय मातोश्री गंगूबाई प्रभू घावटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल, जांभळी मळा (शिरूर) येथे त्यांच्या अर्धपुतळ्याचे भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. यावेळी आळंदी येथील प्रसिद्ध ह.भ.प. सचिन महाराज पवार यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थितांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे संस्थापक प्रा. डॉ. राजेराम प्रभू घावटे यांनी सांगितले की, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीत आणि संस्थेच्या वाटचालीला दिशा देण्यात मातोश्री गंगूबाई घावटे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कष्ट, त्याग, संस्कार आणि जीवनमूल्यांची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीचीही घोषणा करण्यात आली.
यावेळी यशदाचे संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आयपीएस अधिकारी प्रशांत सुभे, माजी आमदार काकासाहेब पलांडे, राणीताई निलेश लंके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, मालतीताई बाबुराव पाचर्णे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे, तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, शिरूर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात आई-वडिलांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत प्रतिकूल परिस्थितीतही दुर्दम्य आशावाद, शिक्षणाची ओढ आणि कष्ट करण्याची तयारी ही यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात घेतलेली भरारी ही मातोश्री गंगूबाई आणि पिताश्री प्रभू घावटे यांनी दिलेल्या संस्कारांचेच फलित असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
“कष्टाला कधीही लाजू नका आणि शिक्षणाची कास सोडू नका,” हा मातोश्रींनी दिलेला जीवनमंत्र आजही प्रेरणादायी असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आणि आईच्या संस्कारांची शिदोरी कायम पाठीशी ठेवून प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी ज्ञानगंगा विश्वविद्यालयाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी केलेली वाटचाल उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.
कार्यक्रमात मातोश्री गंगूबाई घावटे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या त्याग, ममत्व, संस्कार आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या जीवनमूल्यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत मिळत राहावी, यासाठी उभारण्यात आलेला अर्धपुतळा हा केवळ स्मारक नसून मातृशक्तीप्रती कृतज्ञतेचे आणि संस्कारांच्या चिरंतन परंपरेचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार प्रसाद घावटे, सविता घावटे, शांताबाई जयवंत डांगे, हिराबाई धोंडीराम तरटे, अश्विनी सूरज लांडगे, नंदा बाजीराव घावटे, अमृतेश्वरी घावटे, दिपक घावटे आणि सुनील घावटे यांनी केले.

संपादक : सुदर्शन दरेकर

