जागतिक अर्थकारणाचा अभ्यास करूनच पिकांचे नियोजन करा; एआय शेतीचे भविष्य बदलणार : राहुल रसाळ
शिरूर, :चावडीराज न्युज नेटवर्क

शेतीत यशस्वी होण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता जागतिक अर्थकारण, बदलते हवामान आणि बाजारपेठेतील मागणी यांचा अभ्यास करून पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शेती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडविणार असून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला प्रगतिशील शेतकरी राहुल रसाळ यांनी दिला.
माजी आमदार स्वर्गीय बाबुराव दौडकर यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून बाबुराव दौडकर स्मारक समिती व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत निघोज येथे १०० एकर क्षेत्रावर एआय आधारित शेती करणारे प्रगतिशील शेतकरी राहुल रसाळ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, सचिव हेमंत दाभाडे, संभाजीराव गवारी, कृषी विस्तार विषयतज्ज्ञ डॉ. राहुल घाडगे, मदनदादा फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, भगवान शेळके, नगरसेवक उमेश शेळके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाना पोटे, दत्तात्रेय धोंगडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, प्रवीण मुथा आदी उपस्थित होते.
राहुल रसाळ म्हणाले की, शेतमालाचे मूल्यवर्धन करून त्यापासून उपपदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे. भाजीपाला आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत असून त्यानुसार पीकपद्धतीत बदल स्वीकारणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढत जाणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहावे. नवीन पिढीमध्ये शेतीबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर यांनी शासनाच्या पीकविमा योजनेची माहिती देत शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पीक नियोजन करावे, कडधान्य लागवडीकडे वळावे तसेच शासनाने विकसित केलेले कृषीविषयक मोबाईल ॲप डाउनलोड करून त्याचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात धर्मेंद्र खांडरे यांनी बाबुराव दौडकर यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत स्मारक समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एआय, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेली पीकपद्धती याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विठ्ठल वाघ यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केले, तर तानाजी राऊत यांनी आभार मानले.

संपादक : सुदर्शन दरेकर

