शिरूर नगरपालिकेसमोरील मनसेच्या उपोषणाची यशस्वी सांगता; कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या किमान वेतनाची मागणी मान्य

शिरूर, :सुदर्शन दरेकर
शिरूर नगरपालिकेच्या स्वच्छता (घनकचरा) विभागातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिरूर नगरपालिका मुख्यालयासमोर मनसेचे उपजिल्हाप्रमुख महबूब सय्यद यांनी सुरू केलेल्या उपोषणाची शुक्रवारी यशस्वी सांगता झाली. नगरपालिका प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांची दखल घेत घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याची मागणी मान्य केली.
याबाबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.
उपोषण सोडविण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी प्रीतम पाटील नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे ,उपनगराध्यक्ष मितेश गदिया महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष गणेश ताटे, शिरूर भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन दादा पाचर्णे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रवी ढोबळे, नगरसेविका सुनीता पोटे, संगीता मल्लाव, नगरसेवक उमेश शेळके, सागर नरवडे, सुनील जाधव, अभिजित पाचर्णे, ‘आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे रवी बापू सानप, शिरूर शहर प्रवासी संघटनेचे अनिल तात्या बांडे, रवी लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महबूब सय्यद यांनी कंत्राटी स्वच्छता कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या वेतनासह इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी उपोषण छेडले होते. प्रशासनाने प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर उपोषणाची यशस्वी सांगता झाली. यामुळे घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

संपादक : सुदर्शन दरेकर

