ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूर नगरपालिकेविरोधातील मेहबूब सय्यद यांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरु ; तब्येत खालावली, आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत”


मुख्याधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ; महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष( राज्यमंत्री दर्जा )गणेश ताटे, माजी आमदार अशोक पवार, जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दौलत नाना शितोळे प्रदेश जनता दल सेक्युलर अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध संघटनांचा पाठिंबा

शिरूर | सुदर्शन दरेकर
शिरूर नगरपालिकेच्या कथित गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख मेहबूब सय्यद यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. काल शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्यासोबत झालेली प्राथमिक चर्चेची फेरी कोणताही तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सय्यद यांनी व्यक्त केला आहे.
आज ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन मेहबूब सय्यद यांची आरोग्य तपासणी केली. सलग चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांचे वजन कमी होत असून रक्तातील साखरेची (शुगर) पातळीही घटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रकृती खालावत असल्याने आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे गणेश ताटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सय्यद यांची विचारपूस केली. आंदोलनातील मागण्यांबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनाला शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनीही पाठिंबा दर्शविला आहे . तसेच शिरूर शहर भाजपाचे अध्यक्ष गटनेते नितीन पाचर्णे, नगरसेवक संतोष थेऊरकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सय्यद यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.
उपोषणस्थळी नागरिकांची  गर्दी होत असून आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगारांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून उद्यापासून ते आपल्या कुटुंबीयांसह उपोषणात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
आपल्या मागण्या न्याय्य असून त्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी भूमिका मेहबूब सय्यद यांनी कायम ठेवली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
आता शिरूर नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि मेहबूब सय्यद यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *