महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ज्ञानगंगा विश्वविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; स्वराज बोबडे राज्यात पाचवा
शिरूर :सुदर्शन दरेकर
गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानगंगा विश्वविद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यालयातील विद्यार्थी स्वराज तुकाराम बोबडे याने राज्यात पाचवा क्रमांक मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पीयूष नगरे, आरोही वराळ आणि स्वरांजली काळे या विद्यार्थ्यांनीही महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. याशिवाय या परीक्षेत विद्यालयाचे एकूण ५४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, ही संस्था आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतही ज्ञानगंगा विश्वविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. भूषण सात्रस आणि स्नेहल अडसुरे यांनी महाराष्ट्र गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून, या परीक्षेत विद्यालयाचे एकूण २८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि संस्थेचे सातत्यपूर्ण शैक्षणिक धोरण असल्याचे मानले जात आहे. गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजाराम घावटे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जिद्द निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रेरणा देत असतात. कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य या मूल्यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे संस्थेने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजाराम घावटे, उपाध्यक्ष मा. दीपक घावटे, सचिव सौ. सविता घावटे, खजिनदार सुधीर शिंदे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, ॲडमिनिस्ट्रेशन प्रमुख शिशिर जगताप, प्राचार्य प्रा. चेतन देशमुख, मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता पुन्हा एकदा राज्यभर अधोरेखित झाली असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत उमटला आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

